सोलापुरात मंगेश चिवटे यांची जोरदार चर्चा…
सोलापूर : राज्यात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचचे माजी आमदार शहाजी बापु पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली आहे. तसेच पदवीधर मतदारसंघाची जागा भाजपकडे देण्यात यावी, असे शहाजी बापु पाटलांनी शिक्षक मेळाव्यात म्हटले आहे.
शहाजी बापु पाटील यांनी केलेल्या या मागणी मंगेश चिवटे यांना शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा हेतु असल्याचे बोलले जात आहे. मंगेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या जवळचे आहेत, असे वक्तव्य शहाजी बापु पाटील यांनी यावेळी केले.


मंगेश चिवटे हे शिवसेना शिंदे गटातील एक तरुण आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय नेते आहेत. मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे असलेले चिवटे, यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात मुंबईतून केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाची स्थापना केली. वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे, कारण त्यांनीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली होती. सध्या ते उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मंगेश चिवटे निवडणुकीच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी नुकताच सोलापूर येथे ‘शिक्षक पुरस्कार सोहळा’ आयोजित केला होता, ज्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती. दरम्यान, राज्यात आता लवकरच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महायुतीने जागावाटपाची आता तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे.


दरम्यान, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीने देखील प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी स्थानिक निवडणुकांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी वडेट्टीवार आणि थोरातांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली