आई लोकांच्या घरात धुणी भांडी करून एकुलत्या एक मुलाला मोठे केले आणि मुलांनी स्वतःच्याच घरी गळफास घेतला..
सोलापूर : एका १७ वर्षीय किशोरवयीन तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुळे सोलापुरातील अक्षय सोसायटी आज गुरुवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.आदित्य मनोहर काटकर (वय १७ रा.अक्षय सोसायटी सोलापूर) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची आई सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेली होती. त्यावेळी आदित्य घरात एकटा होता. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास त्याची आई घरी परतली तेंव्हा त्याचा मृतदेह छताच्या लाकडी वाशाला ओढणीच्या सहाय्यान गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
मृत आदित्य काटकर याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे. तो दहावी उत्तीर्ण झाला असून घरची परिस्थिती नीट नसल्याने तो एका इस्त्रीच्या दुकानात कामाला जात होता. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार सांगळे पुढील तपास करीत आहेत.