सोलापूर विद्यापीठात ‘सामाजिकशास्त्रे संशोधनातील नवे प्रवाह’वर कार्यशाळा
सोलापूर – समाजातील शेवटच्या घटकापर्यंतच्या समस्यांचा अभ्यास करून व त्यांच्या गरजा ओळखून उपयोगी व विकासाभिमुख संशोधनावर शिक्षक व संशोधकांनी भर द्यावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.



मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्यावतीने पीएम उषा विभागाच्या सहकार्याने सामाजिकशास्त्रे संशोधनातील नवे प्रवाह या विषयावरील आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल वावरे, सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पीएम उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. ऋषिकेश मंडलिक, प्रा. सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ, महानवर म्हणाले की, समाजाशी निगडित संशोधनाला विशेष महत्व राहते. संशोधन झाल्यानंतर त्याचा समाजाला किती उपयोग होतो, हे फार महत्वाचे आहे. भारतात संशोधन व पेटंट वाढत आहे, ही चांगली बाब आहे. विद्यार्थी व नव संशोधकांनी समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर संशोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. वावरे म्हणाले की, संविधानिक मूल्यांची जाणीव संशोधकांना हवी. सामाजिक बदल वेगाने होत आहेत. त्याचा अभ्यास व संशोधन सामाजिकशास्त्रे विभागातील विद्यार्थी व अभ्यासकांनी करणे आवश्यक आहे. नवतंत्रज्ञानामुळे आज समाजात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. एआयमुळे रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने गुणवत्तापूर्ण संशोधन विद्यार्थी व शिक्षकांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. गौतम कांबळे व डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी सामाजिकशास्त्रे संकुलाच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भास्के यांनी केले.