सोलापूर काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. शहर अल्पसंख्याक युवक काँग्रेसचे अध्यक्ष नजीब शेख यांनी आपल्या पदासह पक्षाचे सदस्यत्व सोडत राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते अलिप्त होते.
अखेर त्यांनी आपला राजीनामा शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सादर केला आहे. नरोटे यांनी शेख यांचा राजीनामा मंजूर केल्याचे समजते.
नजीब शेख यांचे वडील दिवंगत सलीम शेख हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय होते. तर नजीब शेख हे खासदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू मानले जात होते. दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, त्यांनी पक्ष मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. तरीही आता काँग्रेसला मोठी गळती सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस सोडल्यानंतर आता नजीब शेख यांची पुढील भूमिका काय राहणार याची चर्चा रंगली आहे. आता शेख हे कोणत्या पक्षात प्रवेश करणार की अलिप्त राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.