31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन…
सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 22 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धेचा शुभारंभ ३ नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून, प्राथमिक फेरी डिसेंबर महिन्यात राज्यातील 10 केंद्रांवर पार पडणार आहे.
या स्पर्धेसाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, तसेच नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सागर नन्नवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
स्पर्धेच्या विविध टप्प्यांमध्ये सहभागी विद्यार्थी आपल्या अभिनय, संवाद कौशल्य आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे दर्शन घडविणार आहेत. शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर न केल्यास प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. तसेच शासन नियमांचे पालन बंधनकारक असून, उल्लंघन केल्यास संबंधित विद्यार्थ्याला अपात्र ठरविण्यात येईल, असे आदिवासी विकास आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये उपजत कलागुण असतात. त्यांना योग्य संधी दिल्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार घडू शकतात. राज्य बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असून, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.