यंदाचे पदयात्रेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
६८ लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हिजन यांचा उपक्रम
सोलापूर : ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन यांच्यावतीने श्रावणमासानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ६८ लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली.
रविवार, 10 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.
श्रावण महिन्यात शहर परिसरातील ६८ लिंगांचे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते, अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे. या पदयात्रेची सुरुवात १९७५ साली कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भुशेट्टी यांनी केली. यंदाचे या पदयात्रेचे 50 वे वर्ष आहे. सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते.
या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथून सुमारे ३०० भाविक सहभागी होतात. या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल (उमानगरी), बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना पुणे नाका, सम्राट चौक, बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक, समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद, होम मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पार्क चौपाटी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे.
ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९४२०६०८४७० या क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस वीरशैव व्हिजनचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, गंगाधर झुरळे, बद्रीनाथ कोडगे-स्वामी उपस्थित होते.