सोलापूर, दि.9- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडून ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षेची माहिती घेतली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासंदर्भात विशेष खबरदारी घेण्याच्या सुचनाही मंत्री श्री सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनास केल्या.
शुक्रवारी, दुपारी मंत्री सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन वार रूमची पाहणी केली, त्यानंतर परीक्षेचा आढावा घेतला. प्रारंभी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. राजश्री देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या अंतिम वर्ष, एटी-केटी, बॅकलॉगच्या ऑनलाइन-ऑफलाईन परीक्षेसंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी मंत्री सामंत यांना सर्व माहिती दिली. यावेळी त्यांनी शुक्रवारच्या ऑनलाईन व ऑफलाईनच्या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याचेही सांगितले. त्यावेळी मंत्री सामंत यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्याचे निर्देश विद्यापीठ प्रशासन दिले.
अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा व स्मारक विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील दीड कोटी रुपये शासन तर 1 कोटी रुपये विद्यापीठ खर्च करणार आहे. अधिकचा निधी लागला तर जिल्हा नियोजन समितीतून घेण्यात येणार आहे व त्यासंदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. याचबरोबर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचा अध्यासन केंद्र तसेच अण्णाभाऊ साठे यांचाही अध्यासन केंद्र आणि महात्मा बसवेश्वर यांचाही अध्यासन केंद्र स्थापन करून अभ्यासकांना संशोधनासाठी संधी दिली जाणार आहे, असेही यावेळी श्री सामंत यांनी स्पष्ट केले. अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा व स्मारक आणि अध्यासन केंद्र याविषयी कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला.