पुणे शहरातील खराडी परिसरात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर रंगेहाथ पकडले गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या जावयाची अटक झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले आहे. हे होणारच होते, मला आधीच माहीत होते. अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो, असा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.
खराडीमधील उच्चभ्रू वसाहतीतील एका महागड्या फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. ऑनलाईन बुकिंगद्वारे घेण्यात आलेल्या या ठिकाणी दारू, हुक्का आणि अमली पदार्थ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या पार्टीत सहभागी असलेल्या पाच जणांना अटक केली असून, त्यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यात प्रांजल खेवलकर यांचे नाव असल्याने प्रकरण अधिक गाजू लागले आहे.
या घटनेनंतर एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपल्या पहिल्या प्रतिक्रिया दिल्या. “यासंदर्भातील माहिती मला तुमच्याकडूनच मिळते आहे आणि हे होणारच होते, हे मला आधीच माहीत होते,” असे सांगत खडसे यांनी या कारवाईमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “अनेक दिवसांपासून विरोधात बोलणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे हा देखील त्याचाच एक भाग असू शकतो.”
एकनाथ खडसे यांनी याप्रकरणात स्थानिक पोलिस तपास करणार नसल्याचा संशयही व्यक्त केला. “स्थानिक पोलिस दबावाखाली असू शकतात. दोषी असेल तर शिक्षा झालीच पाहिजे, पण मला संपूर्ण माहिती मिळाल्यावरच स्पष्टपणे बोलणे शक्य आहे,” असे ते म्हणाले. “जो दोषी आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे, पण जर हे षड्यंत्र असेल, तर तेही समोर आले पाहिजे,” असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.