सोलापूर – सोलापूर ग्रामीण महिलांसाठी एक आदरयुक्त, न्याय्य आणि सुरक्षित जागा निर्माण करेल आणि जी त्यांना सक्षम बनवेल, त्यांचे आरोग्य सुधारेल, स्त्री रोगांसाठी सुलभ किमान उपचारात्मक पर्याय उपलब्ध होतील, अशा पद्धतीने कार्य करणारे एक केंद्र आपल्या भागात असावे, असा उद्दात्त हेतू घेऊन बेलाटी येथील ग्रुप कॅप्टन प्रतापसिंग परदेशी आणि मंगल परदेशी यांच्या मार्गदर्शनातून ‘मंगल प्रताप स्त्री आरोग्य केंद्र’ उभे करण्यात आले. येथे महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. हे केंद्र महिलांच्या आरोग्याविषयी कार्यरत असून, या भागातील महिलांसाठी एक सुरक्षित आणि खात्रीलायक उपचारासाठी हे केंद्र सातत्याने प्रयत्नशील असते. याच हेतूने केंद्रातर्फे तयार करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील महिलांच्या मानसिकतेचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या ‘गर्भसत्य’ या लघुपटाचे लॉन्चिंग आज होत आहे.

आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक सेवा तसेच स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग याबाबत महिलांमधील सजगता वाढवण्यासाठी या केंद्रामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात. गुडघेदुखी, पाठदुखी यासारख्या महिलांच्या दैनंदिन तक्रारींबाबत केवळ आहारातील बदल तसेच स्ट्रेचिंग व्यायामाद्वारे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न येथे करण्यात येतो.
या केंद्राचे काम कम्युनिटी मेडिसन मध्ये एमडी झालेल्या डॉक्टर कुसुम तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर प्रिया अजय चौहान करीत आहेत. त्यांचे टीम मेम्बर्स मीनाआणि पूनम या स्थानिक पातळीवर अत्यंत कसोशीने कार्यरत आहेत. पाथरी व बेलाटी येथील बचत गटांच्या माध्यमातून महिलांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येतो.
गर्भाशयाबाबत माहिती देणारा ‘गर्भसत्य’ हा लघुपट संदीप जाधव यांनी तयार केला आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन उपराष्ट्रपती पुरस्कार विजेते संदीप जाधव यांनी केले असून यात गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे हा उपाय हाडे व हृदयासाठी किती घातक असू शकतो, हे अत्यंत वास्तववादी पद्धतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेजच्या सहकार्याने सांधेदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी यासाठी कॅम्पचे आयोजन करण्याचा या केंद्राचा मानस आहे.
आजार होण्यापूर्वी तपासणी करण्याची मानसिकता ग्रामीण भागात फारच दुर्मिळ आहे. म्हणूनच, आजार झालेला नसताना, महिलांना तपासणी करून घेण्याची मानसिकता तयार करण्यासाठी हे केंद्र प्रयत्नशील असते. ग्रामीण भागातील नागरिकांचा अथवा महिलांचा इंजेक्शन आणि सलाईन लावल्यानंतरच उपचार होतो, असा गोड गैरसमज असल्याने ‘इंजेक्शन व सलाईन लावता का?’ ही ग्रामीण भागातील मानसिकता बदलण्यासाठी केंद्रात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉक्टर कुसुम आणि डॉक्टर प्रिया चौहान यांनी दिली.
बेलाटी येथील केंद्रात सकाळी दहा ते चार या वेळेत अल्प शुल्क घेऊन महिलांची तपासणी करण्यात येते. केंद्रात अल्ट्रासाउंड मशीन उपलब्ध असून दर आठवड्याला डॉक्टर शोभा शहा महिलांची तपासणी करतात. महिलांची एचपी व्ही टेस्ट या केंद्रात करण्यात येते डीजीटीलायझेझेशन, महिलांची संपूर्ण आरोग्यविषयक सेवा, मानसिक तणाव याबाबतही मार्गदर्शन करण्यात येते.