सोलापूर — कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत NTPC सोलापूर यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारितील महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाच्या विकासासाठी आज रु. 2.79 कोटींचा करार आज करण्यात आले. या निधीतून प्राणीसंग्रहालयामधील काळवीटांचे अधिवास व निवासस्थान, बिबट्या व सिंह यांचे क्राल परिसर तसेच मोरांचे अधिवास उभारण्यात येणार आहेत.

सदर करार कार्यक्रम आज सोलापूर महानगरपालिकेत पार पडला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, NTPC सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री. बी.जे.सी. शास्त्री, HR विभागप्रमुख श्री. मनोरंजन सारंगी, पर्यावरण विभागप्रमुख श्री. रफीक उल इस्लाम, DGM HR श्री. अमित सिंग,प्राणी संग्रहालय प्रकल्प विभागाचे उपअभियंता अविनाश वाघमारे, कनिष्ठ अभियंता चेतन प्रचंडे यांच्यासह अन्य अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या निधीद्वारे प्राणीसंग्रहालयाच्या परिसरातील नैसर्गिक अधिवासाची रचना अधिक सुसज्ज केली जाणार आहे. बिबट्या व सिंहांसाठी आधुनिक व सुरक्षित क्राल उभारणे, काळवीट व मोरांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या प्रसंगी NTPC सोलापूरचे आभार मानले. त्यांनी सांगितले की,“प्राणीसंग्रहालय हे सोलापूर शहराच्या पर्यावरणीय जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. NTPC सोलापूरकडून मिळालेला निधी प्राणीसंग्रहालयाच्या दर्जात्मक सुधारणा व अभ्यागतांसाठी अनुभव समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”NTPC सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री. शास्त्री यांनी सांगितले की,“CSR उपक्रमांतर्गत आम्ही समाजाशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतो. प्राणीसंग्रहालयाचा विकास म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण व भावी पिढ्यांसाठी शाश्वत जीवनमूल्यांची जपणूक.”
हा उपक्रम सोलापूर शहरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणार असून, शालेय विद्यार्थी, पर्यटक व नागरिकांसाठीही हे एक शैक्षणिक व मनोरंजनात्मक स्थळ ठरणार आहे.