सोलापूर दि.22 (जिमाका) शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राज्य व केंद्र पुरस्कृत योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांकरीता यापुर्वी बीम्स प्रणालीवर प्राप्त होणाऱ्या अर्थसहाय्याचे वितरण तहसिल स्तरावरून बँकेत पाठवून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जात होते.
तथापि महाराष्ट्र शासनाच्या नविन धोरणानुसार माहे डिसेंबर 2024 पासून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान राज्यशासनामार्फत DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याअनुषंगाने सदर योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांची माहिती दि. 31 जुलै 2025 पुर्वी डीबीटी वर भरण्याची कार्यवाही 100 टक्के तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना संजय गांधी निराधार योजना कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार सदर योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांची माहिती डी.बी.टी. पोर्टलवर भरणे व त्यांचे आधार पडताळणी करणेचे कामकाज सुरु आहे. तरी बऱ्याच लाभार्थ्यांनी सदर बाबत इकडील कार्यालयात हयात प्रमाणपत्र किंवा संबंधित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड करणेकामी आवश्यक कागदपत्र संजय गांधी निराधार योजना कार्यालयात सादर केलेल नाहीत. त्यामुळे त्यांना अनुदानाचा लाभ घेता आलेला नाही. अशा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही DBT Portal वर माहिती upload केलेली नाही त्याची यादी खालील ठिकाणी प्रसिध्द केलेली आहे.
मा.उपविभागीय अधिकारी क्र.1,उपविभागीय कार्यालय, सोलापूर, 2.तहसिलदार उत्तर, सोलापूर 3.विभागीय अधिकारी, विभागीय कार्यालय क्र.3, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 4. विभागीय अधिकारी, विभागीय कार्यालय क्र.8, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, 5. परिमंडळ अधिकारी अ,ब,क, 6. मंडळ अधिकारी कसबे सोलापूर, 7. तलाठी कसबे सोलापूर.
तरी वरील ठिकाणी प्रसिध्द करणेत आलेल्या यादीतील लाभार्थी यांनी तात्काळ आपली माहिती upload करणेकामी बँक पासबुक, आधारकार्ड, (आधार कार्ड व मोबाईल नंबर बँकेच्या खात्याला लिंक मोबाईल नंबर, आधार कार्डला लिंक असलेले ), शिधापत्रिका, अपंग प्रमाणपत्र, विधवा महिलेच्या बाबतीत पती मृत्यु दाखला इ. आवश्यक कागदपत्रासह दि. 31 जुलै 2025 पुर्वी संजय गांधी शहर शाखा कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे संपर्क साधल्यास डीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थ्यांचे नाव समाविष्ट करण्याची कार्यवाही करणेत येईल.
जे लाभार्थी डीबीटी प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करणेकामी दि.31 जुलै 2025 पुर्वी आवश्यक कागदपत्रे या कार्यालयास जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांची माहिती विहीत मुदतीत प्राप्त होणार नाही अश्या लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येतील याचीही नोंद घ्यावी. अशी माहिती संजय गांधी निराधार योजना शहरच्या तहसिलदार शिल्पा पाटील, यांनी कळविले आहे.