मुंबई – सभागृहामध्ये रम्मी खेळल्या प्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार होत आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन केले जात आहे. मात्र, या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. मी रम्मी खेळलेलो नाही, मला रम्मी खेळता येत नाही, असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी याप्रकरणी आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर बदनामी करणाऱ्यांना आपण कोर्टात खेचणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांना पत्र देणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
रम्मी प्रकरणावर माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, मला माझ्या अधिकाऱ्यांकडून सभागृहात उत्तर देण्यासाठी माहिती मागवायची होती. त्यासाठी मी मोबाईल मागवला होता. तो मोबाइल देखील माझा नव्हता. मोबाइल हातात घेताच त्यावर गेम सुरू झाला. मात्र, असे गेल काही सेकंद स्किप करता येत नाहीत. तो स्किप करण्याचा प्रयत्न करत असताना 15 ते 20 सेकंदाचा वेळ लागतो. तेवढ्याच वेळात काढलेला तो व्हिडिओ आहे. त्यानंतर गेम स्किप झाला आणि मी माझे काम केले. मात्र, नंतरचा व्हिडिओ समोर आणलेला नाही, असा दावा कोकाटे यांनी केला आहे.
राजीनामा देण्यासारखे काय घडले?
रम्मी प्रकरणावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणाचा विनयभंग केला का? काही गुन्हा केला का? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मी शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला नाही. मी बलात्कार केलेला नाही किंवा माझी कोणत्याही गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी नाही. त्यामुळे राजीनामा देण्यासारखे काय घडले? असा प्रतिप्रश्न माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. दोषी सापडलो तर कोणालाही न सांगता आधी राज्यपालांकडे जाऊन थेट राजीनामा देईल, अशा शब्दात माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मी कधीच रम्मी खेळलेलो नाही, मला रम्मीच खेळता येत नाही
हा अत्यंत छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला? असा प्रश्न माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. ऑनलाइन रम्मी खेळताना आपला मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक त्याला जॉइन करावा लागतो. ज्या दिवसापासून ऑनलाईन रम्मी सुरु झाली, त्या दिवसापासून एक रुपयाची देखील रम्मी मी खेळलेलो नाही. मला रम्मी खेळता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. अशा पद्धतीचा आरोप करणे बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा
महाराष्ट्रात यामुळे माझी मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. ज्या राजकीय नेत्यांनी हा आरोप केला आहे. ज्यांनी- ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांना कोर्टात खेचल्या शिवाय मी राहणार नाही, असा इशारा माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे. ज्या गोष्टीचा शेतकऱ्यांशी संबंध नाही. त्या सर्वांनी याच गोष्टी दाखवल्या गेल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात सर्वांचा सीडीआर तपास करण्याची मागणी माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांना पत्र देणार असल्याचे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.
कृषी समृद्धी योजना लाँच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजना लाँच करण्यात येत असल्याची घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा सरकारचा मानस असल्याचे ते म्हणाले. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी लागणारी औषधी आणि बी बियाणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे कृषिमंत्री यांनी म्हटले आहे. यासाठी अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडे आपण केली होता. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लगेच त्याला मंजुरी दिली आहे, असे देखील माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. या योजनेमध्ये काही त्रुटी आढळल्या तर चार ते सहा महिन्यांमध्ये त्याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना अत्यंत सुलभ योजना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.