सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत, आज त्यांना “उत्कृष्ट अधिकारी” या सन्मानाने गौरविण्यात आले.


स्वच्छता अभियानात सोलापूरचा 23 वा क्रमांक तर राज्यात 6 वा क्रमांक:
स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सोलापूर शहराने राष्ट्रीय पातळीवर ६३ व्या क्रमांकावरून २३ व्या क्रमांकावर, तर राज्य पातळीवर १४ व्या क्रमांकावरून ६ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शहराला कचरामुक्त शहरात ३ स्टार मानांकन आणि OD++ मानांकनही प्राप्त झाले आहे. या यशात मोलाचा वाटा उचलणारे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सहा. आयुक्त शशिकांत भोसले, आणि मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांचा विशेष गौरव करण्यात आला.
महसूल वाढीत विक्रमी कामगिरी:
मालमत्ता कर विभाग आणि नगर रचना विभागाने महसूल वाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ तीन महिन्यांत मालमत्ता करातून ५७ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केल्याबद्दल मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे आणि मालमत्ता कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांना सन्मानित करण्यात आले.
त्याचप्रमाणे, नवीन बांधकाम परवानग्या, विविध प्रीमियम ले-आउट परवानग्या आणि विविध चार्जेस मधून आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यात १२ कोटी रुपयांची उल्लेखनीय वसुली करून महानगरपालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ केल्याबद्दल उपसंचालक, नगर रचना विभागाचे मनीष भिष्णुकर यांचाही गौरव करण्यात आला.
‘माय सोलापूर’ ॲपमुळे नागरिकांचा वाढला विश्वास:
सोलापूर महापालिकेच्या “माय सोलापूर” या मोबाईल ॲपमुळे नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि समाधानकारक निराकरण करण्यात यश आले आहे. तक्रारी वेळेत सोडवण्यात आल्या असून, नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट ॲपवर ५ स्टार रेटिंग दिली आहे. या यशस्वी प्रणालीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता भाऊसाहेब तानाजी गेजगे, कनिष्ठ अभियंता प्रेमनाथ पवार, आणि सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे कनिष्ठ अभियंता शेफाली सुभाष दिलपाक यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत ‘माय सोलापूर’ ॲपद्वारे चार हजार नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यांचे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे निवारण केले.
डिजिटल सेवांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान:
संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर आणि त्यांच्या टीमने ऑनलाइन टॅक्स वसुलीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे कर वसुलीत मोठी मदत झाली. तसेच, ‘राईट टू सर्व्हिस ऍक्ट’ अंतर्गत 119 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उर्वरित सेवाही येत्या महिन्याभरात पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा मानस आहे. प्रशासनाने दिलेल्या १५० दिवसांचा कार्यक्रम २ ऑक्टोबर या मुदतीपूर्वीच १००% पूर्ण करण्याचा सोलापूर महानगरपालिकेचा संकल्प आहे.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आवाहन:
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व सन्मानित अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कार्यशैलीचा इतर अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, “सतत नागरिकाभिमुख सेवा देण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट असून, यामध्ये या अधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे.” त्यांनी नमूद केले की, खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रात वेतनवाढ किंवा पदोन्नती देणे सोपे नसते, त्यामुळे अशा प्रशस्तीपत्राने त्यांचे कार्य आणि प्रोत्साहन इतरांनाही प्रामाणिकपणे व उत्साहाने काम करण्यास प्रेरित करेल. त्यांनी हे देखील सांगितले की, जे अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे कार्य वेळेत पूर्ण करत नाहीत किंवा चुका करतात, त्यांना दंडही आकारण्यात आला आहे.
घंटागाडी योजना:
महानगरपालिकेतील घंटागाड्यांची संख्या वाढवण्यासाठी सीएसआर फंडद्वारे महाराष्ट्र बँक आणि आयसीआयसीआय बँक कडून दोन कोटी रुपये मिळणार असून, त्यातून काही नवीन घंटागाड्या घेण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न सुरू आहे.