राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा वादात अडकले होते. आता विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले असून या अधिवेशनात ते सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. त्यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आता खुद्द माणिकराव कोकाटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना म्हणाले, “मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मी युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.”
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले, माझ्यावर विरोधी पक्ष वैयक्तिक टीका करतो. कधी माझ्या कपड्यांवर कधी एखाद्या विधानावर टीका केली जाते. पण माझ्या धोरणांवर, कामावर किंवा मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर विरोधी पक्ष कधीही बोलत नाही. माझे काम पारदर्शी आहे, माझा स्वभाव स्पष्ट आहे. विधिमंडळाच्या सभागृहात कॅमेरे आहेत. तिथे अनुचित प्रकार करू नये, याची मला पूर्ण कल्पना आहे. मग मी गेम का खेळेल?
माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ सत्ताधाऱ्यापैकीच कुणीतरी काढला असावा, असा आरोप होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, व्हिडीओ काढला त्याबाबत मला आक्षेप नाही. पण या व्हिडीओच्या माध्यमातून मला लक्ष्य करण्यात येत आहे. रोहित पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी काय काम केले आहे? असा सवाल कोकाटे यांनी उपस्थित केला.
माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले, “युट्यूबवर कुणीही व्हिडीओ सुरू केल्यानंतर त्यावर रमी खेळाच्या जाहिराती येतात. रोहित पवार यांच्याही मोबाइलमध्ये त्या येत असतील. सोशल मीडियावर जाहिराती येतच असतात. पण कुठल्या गोष्टीचे भांडवल करावे आणि करू नये, याचे रोहित पवारांना भान असावे.”