प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेते मंडळी उपस्थिती नव्हती. मात्र लवकरच शासन कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे संकेत आहेत.
नुकतीच आषाढी यात्रा संपन्न झाली, पावसाळी अधिवेशन ही शुक्रवारी संपले. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहराचा नकाशा समोर ठेवून मुख्यमंत्र्यांना नियोजित कॉरिडॉरचा प्रस्ताव बारकाईने समजावून सांगितला असल्याचे दिसते. शिवाय समाजमाध्यमावरील सीएमओंच्या वॉलवरुन बैठकीचे फोटो शेअर केले गेले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉरिडॉरची तयारी आणि आराखडा पूर्ण झालेला आहे. यासंदर्भात बाधित लोकांशी चर्चा करण्यापूर्वी नुकसान भरपाई संदर्भात काही मुद्दे मुख्य मंत्र्यांसमोर मांडण्यात आले आहेत. आषाढी यात्रा काळातही कॉरिडॉरचे काम एका विशेष पथकाने केल्याची चर्चा आहे.
