मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला : पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी सुपूर्द केला धनादेश
सोलापूर – जगजीवनराम झोपडपट्टीतील दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या दोन शाळकरी मुलींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते शनिवारी हे धनादेश प्रदान करण्यात आले. यावेळी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे जिया महादेव म्हेत्रे व ममता अशोक म्हेत्रे या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच पुढीलकाळात सोलापूर शहरात अशा दुर्दैवी घटना होऊ नये याकरिता महापालिका प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. हातावरचे पोट असणाऱ्या झोपडपट्टीतील या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिले होते. यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आणि जिया महादेव म्हेत्रे आणि ममता अशोक म्हेत्रे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून दिली.
याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, दोन शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू ही सर्वांसाठीच अत्यंत वेदनादायी घटना होती. या मुलींच्या कुटुंबीयांनी अश्रूपूर्ण नयनांनी हे धनादेश स्वीकारले. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळत असल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, किसन जाधव, मोची समाज अध्यक्ष करेप्पा जंगम, माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी नगरसेविका मिनाक्षी कंपली, जेम्स जंगम, अंबादास करगुळे, भाजपा मंडल अध्यक्ष नागेश खरात, अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागनाथ कासलोलकर, संतोष कदम, रतिकांत कमलापूरे, रुपेश जक्कल, अनंत गोडलोलू, विठ्ठल म्हेत्रे, सैदप्पा जंगडेकर, बाबू उपळेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. दुर्दैवी घटनेमुळे सामान्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या कठीण काळात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन ही मदत मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. – देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य
