सोलापूर – संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत भारत 70 टक्के आत्मनिर्भर झाल्याचे संरक्षण मंत्रालयातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुशील गायकवाड यांनी स्पष्ट केले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरने आयोजित केलेल्या के भोगिशयना स्मृती व्याख्यानात शनिवारी ते बोलत होते. संरक्षण उत्पादनाचा विचार केला तर गेल्या दहा वर्षात संरक्षण उत्पादने तिपटीने वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारतातून 100 देशांना संरक्षण उत्पादनांची निर्यात होत असल्याचे सांगून गायकवाड म्हणाले की 100% आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने भारत वाटचाल करीत आहे. 2025 हे संरक्षण सुधारणांचे वर्ष म्हणून पाळण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज भारतामध्ये संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या 550 वस्तू बनवल्या जातात. धनुष गन्स, सोनर सिस्टिम्स, लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारत निर्यात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारताचे संरक्षण बजेट 6.8 लाख कोटी रुपयांचे असून प्रतिवर्षी त्यामध्ये नऊ ते दहा टक्के वाढ होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत आपल्या संरक्षण दलांना आधुनिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. यासाठी नवीन शस्त्रे आणि तंत्रज्ञान खरेदी करणे, तसेच देशातच संरक्षण उपकरणे विकसित करणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. यासोबतच, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) देखील संरक्षण क्षेत्रातील संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा धनश्री केळकर यांनी स्वागत केले. तर माजी अध्यक्ष सीए राजगोपाल मिणियार यांनी माजी प्रांतपाल भोगिशयांविषयीची माहिती दिली. डॉ. राजीव प्रधान यांनी सुशील गायकवाड यांची ओळख करून दिली तर सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले. सुहास लाहोटी यांनी सूत्रसंचलन केले.