सोलापूर विद्यापीठात प्राथमिक व माध्यमिकच्या दोन हजार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू!
सोलापूर – शालेय जीवनातील मुलांमध्ये उत्सुकता आणि विचार करण्याची प्रचंड क्षमता असते. त्यामुळे चांगले संशोधक घडून त्यातून उत्तम समाज निर्मिती व्हावी, याकरिता दैनंदिन जीवनातील समस्यांना संशोधनाशी जोडण्याचे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देण्याची आवश्यकता आहे. तसेच शालेय वयातच त्यांच्यावर संशोधन, कौशल्य व उद्यमशीलतेचे संस्कार करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित ‘उद्यमशाळा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवारी विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, राष्ट्रीय शोधयात्रा अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक चेतन पटेल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. विकास पाटील, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, सेवावर्धिनी, स्वदेशी जागरण मंच, साविष्कार या संस्था सहआयोजक आहेत. एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग आहे.



कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात बुद्ध्यांक अधिक असलेले विद्यार्थी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांनी नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे, असे स्वप्न शिक्षकांनी दाखवावे. त्याकरिता शालेय विद्यार्थ्यांना संशोधन, कौशल्याधारित शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती रुजवल्यास जागतिक दर्जाचे संशोधक आणि उद्योजक निश्चितपणे घडतील, असा आशावादही कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला.
चेतन पाटील म्हणाले, शिक्षकांनी मुलांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्यावे. त्यातून संशोधक, उद्योजक, शास्त्रज्ञ घडतील. कोणतेही संशोधन समस्या संपवते. शालेय शिक्षणाला समाजाशी जोडण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना संशोधक, चांगली शेती करणारे शेतकरी, उत्कृष्ट कारागीर यांची प्रत्यक्ष भेट घालून देणे आवश्यक आहे. यातून विद्यार्थ्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल.
प्र- कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी संशोधन, क्रीडा, पर्यावरण, कौशल्य विकास आदी क्षेत्रात कार्य करत आहे. विद्यार्थ्यांनी विविध स्टार्टअपमध्ये सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांना या विषयात रुची निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख म्हणाले, बाल वयातच विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्याची गरज आहे. त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात होणार आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही यावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक आणि उद्योजक वृत्ती घडण्यासाठी अशा कार्यशाळांचा निश्चित उपयोग होईल, असेही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख यांनी सांगितले.
प्रा. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. सेवावर्धिनीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकुर यांनी परिचय करून दिला. प्रा. तेजस्विनी कांबळे आणि प्रा. श्रुती देवळे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी प्रिसिजन फाउंडेशन जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, सर फाउंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, सेवावर्धिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश देगावकर, स्वदेशी जागरण मंच प्रांत संयोजक मुकुल वैद्य, उद्यम इनक्युबॅशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश गुराणी, अरविंद दोरवट, चन्नवीर बंकुर, साविष्कारचे शिवरत्न पवार, आदित्य मुसके, ओम इंगळे, एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे प्रा. डॉ. सचिन लड्डा, भगीरथ ग्रामविकासचे डॉ. प्रसाद देवधर, अनघा जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हाभरातील शालेय विद्यार्थ्यांना दाखवणार विद्यापीठातील संशोधन
सोलापूर जिल्हाभरातील शालेय विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात खडकशास्त्र, पुरातत्वशास्त्र, रसायनशास्त्र अशा विविध विभागांमध्ये सुरू असलेले संशोधन तसेच विद्यापीठा नजीक असलेले विज्ञान केंद्र दाखविण्यात येईल, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी याप्रसंगी सांगितले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित ‘उद्यमशाळा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, राष्ट्रीय शोधयात्रा अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक चेतन पटेल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कादर शेख, गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, डॉ. विकास पाटील, डॉ. प्रभाकर कोळेकर व अन्य.