सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूर्यकांत भुजबळ यांनी बुधवारी दुपारी पदभार स्वीकारला आहे.तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचा अतिरिक्त पदभार प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याकडेच होता. गेल्या महिन्यात लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांची सोलापूर झेडपीकडे नियुक्ती झाली होती. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर धाराशिव ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची मंगळवारी झालेल्या बदलांमध्ये नियुक्ती झाली. भुजबळ हे 2014 च्या बॅचचे आहेत. प्रशिक्षणाधिकारी अधिकारी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर उत्तर सोलापूरचे बीडीओ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. औसा, धाराशिव येथे कामकाजानंतर त्यांना पुन्हा सोलापूरला संधी मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनानंतर ग्रामपंचायत विभागाच्या कामाला नव्याने सुरुवात करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.