सोलापूर – सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा आजपासून आत्मन स्पोर्ट्स अकॅडमीत उत्साहात सुरू झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत एकूण २८१ खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग नोंदवत न भुतो न भविश्यती अश्या एकूण ३६३ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत आणि याचबरोबर SDBA च्या इतिहासात नवीन मैलाचा दगड निर्माण झाला आहे. ही तीन दिवसीय स्पर्धा ११ ते १३ जुलै दरम्यान खेळवली जात असून, जिल्ह्यातील विविध वयोगटांतील खेळाडू मैदानात उतरले आहेत.
उद्घाटन सोहळा सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी असोसिएशनचे सर्व कार्यकारी सदस्य उपस्थित होते. पवार यांनी सोलापूरमध्ये उत्कृष्ट क्रीडा सुविधा विकसित करण्याचा विश्वास दिला आणि खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कठोर मेहनत करण्याचे आवाहन केले.
आत्मन स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये खेळाडूंना स्पर्धेसाठी योग्य वातावरण आणि उत्तम व्यवस्थापन पुरवले गेले आहे. खेळाडूंचा उत्साह आणि स्पर्धेचे वातावरण पाहून ही स्पर्धा जिल्ह्यातील बॅडमिंटनचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
सोलापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनने सर्व सोलापूरकरांना ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.