मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीना यांनी मंगळवार, दि. १ जुलै २०२५ रोजी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून अतिरिक्त कार्यभार स्विकारला आहे. धर्म वीर मीना हे १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे सर्व्हिस ऑफ सिग्नल इंजिनिअर्स (IRSSE) चे अधिकारी आहेत. त्यांनी १९८८ मध्ये जोधपूर येथील एम.बी.एम. इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये इंजिनिअरिंग पदवी (बी.ई.) पूर्ण केली आहे आणि विधी (Law) पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. ते मार्च १९९० मध्ये रेल्वे सेवेमध्ये आले आणि त्यांनी दक्षिण पूर्व रेल्वे, पश्चिम रेल्वे, पश्चिम मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या मुख्यालयात तसेच क्षेत्रीय कार्यालयांत अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळातील वैशिष्ट्य म्हणजे सिग्नलिंग प्रकल्प आणि विविध मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांशी संबंधित सिग्नलिंग कामे, सुरक्षितता कामे विक्रमी वेळेत पूर्ण करणे हे होय.
मीना यांनी १९९२ मध्ये दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये सहाय्यक सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, शहडोल येथील आव्हानात्मक भूमिकांसह कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९९८ पर्यंत विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, बिलासपूर आणि वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता, खुर्दा रोड म्हणून काम केले. त्यानंतर, पश्चिम रेल्वेमध्ये, त्यांनी सिग्नलिंग स्थापना, रेकॉर्ड मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांशी संबंधित सिग्नलिंग कामे (विरमगाम जंक्शन – सामाख्याली जंक्शन आणि सुरेंद्रनगर – राजकोट, अहमदाबाद – महेसाणा जंक्शनचे दुहेरीकरणासह गेज रूपांतरण) अशी सिस्टमची एकूण विश्वासार्हता सुधारण्यासाठी विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, दर आठवड्याला एकापेक्षा जास्त स्थापना (installations) पुर्ण करण्यात आल्या. नाविन्यपूर्ण पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे अनुकूलन करून गतिशीलता, थ्रूपुट वाढवणे ही त्यांच्या कार्यकाळातील परिभाषित वैशिष्ट्ये होती. अहमदाबाद विभागातील वडनगर आणि विसनगर दरम्यानचा पहिला एम्बेडेड ब्लॉक पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. वर्ष २०२० मध्ये त्यांनी भारतीय रेल्वे सिग्नल इंजिनिअरिंग मॅन्युअल (IRSEM) पुनरावलोकन समितीचे सदस्य म्हणूनही काम केले.
पश्चिम मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (PCSTE) म्हणून, त्यांनी मथुरा जंक्शन ते नागदा जंक्शन पर्यंत ५४८ किमी लांबीचे कवच प्रणालीचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले. यामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (EI) [न्यू कटनी जंक्शन (NKJ) च्या मेगा यार्डसह 994 रुट्स, ऑटोमॅटिक सिग्नलिंग वर्क्स (ABS), लेव्हल क्रॉसिंग (LC) इंटरलॉकिंग वर्क्स, मेकॅनिकल सिग्नलिंगचे निर्मूलन इ.] यांचा समावेश आहे. कवच प्रणाली लागू करण्याच्या त्यांच्या प्रमुख उपक्रमांचा अनुभव लक्षात घेऊन भारतीय रेल्वेमध्ये कवच प्रणालीच्या जलद अंमलबजावणीसाठी अनुभव सामायिकरण आणि सहकार्यासाठी माननीय रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या ‘कवच वर्किंग ग्रुप’चे नेतृत्वदेखील त्यांनी केले.
त्यानंतर, एप्रिल २०२४ पासून मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (PCSTE) या पदावर असताना, त्यांनी विक्रमी ८८ सिग्नलिंग आणि संबंधित स्थापित (installations) कार्ये केली, ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कार्य येथील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय), ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस), ब्लॉक प्रोव्हिंग बाय अॅक्सल काउंटर्स (बीपीएसी), वेग वाढवणे, मल्टीट्रॅकिंग प्रकल्प, परिचालनातील अडचणी दूर करणे, लेव्हल क्रॉसिंग इंटरलॉकिंग आणि क्लोजर वर्क्स, मोबिलिटी आणि थ्रूपुट वाढवण्याच्या कामांसह अनेक
महत्त्वपूर्ण कामे १२६ दिवसांत पूर्ण करण्याचा समावेश आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये संपूर्ण क्षेत्रांतील रुळांवरती कवच प्रणालीचे नियोजन करणारी मध्य रेल्वे पहिली रेल्वे बनली आहे. ज्यासाठीची कामे संपूर्ण झोनल नेटवर्कसाठी जलद गतीने सुरू आहेत. दुहेरीकरणात आतापर्यंतची सर्वोत्तम प्रगती गाठली आहे. त्यांच्या कार्यकाळात मल्टीट्रॅकिंग आणि क्षमता वाढ साध्य झाली आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, गतिशीलता वाढविण्यासाठी, अतिरिक्त/नवीन गाड्या सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेच्या प्रमुख यार्डमध्ये विविध कामांचे नियोजन व अंमलबजावणी जलद गतीने सुरू आहे.
त्यांच्या विविध कार्यकाळामध्ये, त्यांनी प्रवासी सुविधांमध्ये आमुलाग्र बदल करून प्रवाशांच्या सोयींमध्ये माहितीच्या प्रसारातून वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. वर्ष २००९ ते २०१४ पर्यंत, पश्चिम रेल्वेवर उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून, त्यांनी संस्थेची नितिमत्ता, पारदर्शकता आणि उत्पादकता वाढविण्यासाठी दक्षता (Vigilance) विभागाचा सुधारात्मक आणि रचनात्मक साधन म्हणून वापरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दक्षता प्रणाली सॉफ्टवेअर (IRVINS) लागू केली. या प्रयत्नांच्या महत्वाची दाखल घेत त्यांना २०१३ मध्ये माननीय रेल्वे मंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मीना यांनी INSEAD, सिंगापूर आणि ICLIF, मलेशिया येथे प्रगत व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आणि ISB, हैदराबाद येथे धोरणात्मक व्यवस्थापन कार्यशाळेत सहभाग घेतला आहे. त्यांचे योगदान उच्च सुरक्षा मानके आणि प्रगत, स्वदेशी विकसित तंत्रज्ञान प्रणालींसह भारतीय रेल्वेला वाहतुकीत जागतिक नेतृत्वस्थानी नेण्याच्या व्यापक धोरणाचा भाग आहेत.