येस न्युज मराठी नेटवर्क : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितलं.