बार्शी – शहर पोलिसांनी २७ वर्षांपासून खून प्रकरणात फरार असलेल्या विनायक फुरडे या आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने फुरडे याला ५ वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावला होता, परंतु तो जामीनानंतर फरार झाला होता. पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला त्याच्या मूळ गावी कांदलगाव येथे मोठ्या शिताफीने अटक केली.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल २७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केले आहे. विनायक साहेबराव फुरडे (रा. कांदलगाव, सध्या रा. ढाकेवाडी, कसबापेठ, बार्शी) असे आरोपीचे नाव आहे.याला जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी ५ वर्षांची सक्तमजुरी व रु. २०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली होती.सदर शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालय, मुंबई येथे जामीना करिता अर्ज दाखल केले होते. त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला होता. मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला. यानंतर आरोपी फरार झाला होता.
विनायक फुरडे सत्तावीस वर्षापूर्वी फरार झाला होता. न्यायालयाने अटक वॉरंट जारी करून पोलिसांना त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची दिशा आखली.बार्शी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार प्रल्हाद अकुलवार यांना गुप्त माहिती मिळाली.सत्तावीस वर्षांपासून फरार आरोपी हा मूळ गावी कंदलगावात आहे.गुप्त माहीतीच्या आधारे १३ मे २०२५ रोजी आरोपी विनायक फुरडे हा कांदलगाव येथे असल्याचे समजले. तत्काळ कारवाई करत गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत शिताफीने त्यास अटक केली व न्यायालयात हजर केले.
सत्तावीस वर्षांपासून फरार आरोपीस अटक करण्यात बार्शी पोलिसांनी महत्वाची भूमिका पार पाडली. ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सहाय्यक पोलीस फौजदार अजित वरपे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब घाडगे, श्रीमंत खराडे, पोलीस नाईक अमोल माने, संगप्पा मुळे, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, राहुल उदार, सचिन नितनात, अवि पवार, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख आणि इसामियाँ बहिरे यांनी एकत्रितपणे बजावली.