माजी मंत्री तसेच सहकारचे जाळे उभा करून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या सुभाष देशमुख यांना आता स्वकीयांबरोबरच पाण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. आ. सुभाष देशमुख यांच्या तालमीत तयार झालेले आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार, अविनाश महागावकर यांच्यासह अनेक जण दुरावले आहेत. त्यामुळेच ते नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी गटात दिसले. हे सहन न झाल्यामुळे सुभाष देशमुख काही उद्योजकांना घेऊन दुबई दौऱ्यावर गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन कल्याण शेट्टी यांना जोरदार ताकद दिल्यामुळे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आता सचिन कल्याण शेट्टी यांच्या मध्यस्थीने सोलापूर बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वार्ता पसरू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा सुभाष देशमुख विरुद्ध दिलीप माने हा राजकीय संघर्ष दक्षिण सोलापूर तालुक्यात पेटणार असा दिसतोय. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हट्टा पायी उजनी धरणातील पाणी थेट कुरनूर धरणात अधिकाऱ्यांनी पोहोचविले मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी मागणी करून देखील दक्षिण सोलापुरातील सीना नदीकाठ दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. आमदार सुभाष देशमुख यांना 12 मे पासून पाणी सोडले जाईल असे उजनीच्या अधीक्षक अभियंतांनी सांगितले देखील होते. मात्र ते पाणी सोडलेच नाही. यासाठी आज सुभाष देशमुख सत्ताधारी असताना आणि जलसंपदा मंत्री भाजपचेच राधाकृष्ण विखे पाटील असताना देखील आमदार सुभाष देशमुख यांना आंदोलन करण्याची वेळ आली हे दुर्दैव.