जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या एका भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात आणि जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारताने १५ दिवसांनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ चालवून पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे.
दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत पहलगाममधील भ्याड हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. त्यातच पाकिस्तानकडून सीमारेषेवर सतत गोळीबार सुरू आहे. आता पाकिस्तानने पुन्हा एकदा त्याचे खरे स्वरूप दाखवत अमृतसरजवळच्याजेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवली
पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. संभाव्य धोके लक्षात घेऊन सर्वत्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात १३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५९ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वजण पूंछमधील आहेत, तर जखमींपैकी ४४ जणही पूंछमधील आहेत.