पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं.
मध्यरात्रीनंतर पाकिस्तानच्या हद्दीत स्फोटांचे आवाज!
मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचं, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचं आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं मोठं नुकसान भारतानं केल्याचं स्पष्ट झालं आहे
कोणत्या ९ ठिकाणांना केलं लक्ष्य?
दरम्यान, भारतानं कोणत्या ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, याची यादी समोर आली आहे.
१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद
अशी ती ९ ठिकाणं आहेत. या ठिकाणी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांचे तळ होते. या ठिकाणी मोठ्या संख्येनं दहशतवादी असल्याची माहिती भारतीय लष्कराकडे होती. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने फक्त याच ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या तळावरदेखील हल्ला केलेला नाही.पाकिस्तानला लक्ष्य करताना भारतानं याआधीही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले आहेत. पण १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तपणे पाकिस्तानविरोधातल्या कारवाईत सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकी वेळ…१ वाजून २८ मिनिटं!
भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर म्हणजेच १ वाजून २८ मिनिटांनी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. पुढच्या २३ मिनिटांत सर्व ९ दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले होते. या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर ऑपरेशन सिंदूरसाठी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.