“लाडकी बहिण योजनेमुळे सरकार आलं. त्यावर आक्षेप घेण्याच कारण नाही. या पद्धतीने पैसे कमी करु नका. इतर अनेक मार्ग आहेत. लाडकी बहिण योजनेच सरकारवर थोडसं बर्डन आहे हे सर्व मान्य करतात” ही कबुली संजय शिरसाट यांनी दिली. “ही योजना बंद होऊ नये. पैसे मिळाले पाहिजेत, ही आमची धारणा आहे. आमदाराला निधी कमी, जास्त देणं हा भाग वेगळा आहे. पण खात्याला वर्गीकरण करुन पैसे दिले जातात. तुम्हाला नियमानुसार पैसे द्यावे लागतात, ते बंधनकारक आहे” असं संजय शिरसाट म्हणाले.
‘माझ्या खात्याचा हक्काचा निधी मला मिळला पाहिजे’
“अजितदादांवर राग आहे का? हे शकुनी मामा कोण? हे जे कोणी प्रश्न निर्माण करतायत, त्याच्याशी काही देणघेणं नाही. मी त्या भागडीत पडत नाही. मी माझ्या खात्यापुरता पाहतो” असं संजय शिरसाट म्हणाले. “पैसे नसतील तर अडचण येणार. काही मुलांना पैसे देऊ शकलो नाही. जर असा निधीला कट बसला, तर हा त्रास जाणवणार” असं संजय शिरसाट म्हणाले.
‘भले कर्ज काढावं लागेल’
“राज्याची आर्थिक घडी कशी बसवायची हा वरिष्ठ पातळीवर विषय आहे. लाडकी बहिण योजनेत 1500 चे 2100 रुपये होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा वेगळ्या अर्थाने बाऊ करतात. योजना बंद करणार का? आमची जी कमिटमेंट आहे, ती पूर्ण करणार. राज्यावर आर्थिक भार आला आहे. त्यासाठी पर्याय वेगवेगळे आहेत. भले कर्ज काढावं लागेल. 1500 रुपये मिळणार एवढं नक्की” असं संजय शिरसाट म्हणाले.