साहित्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम साधणाऱ्या प्रिसिजन वाचन अभियान अंतर्गत ‘वस्त्रगाथा’ या पुस्तकावर आधारित एक समृद्ध अनुभव देणारा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ‘वस्त्रगाथा’ या पुस्तकाचे लेखक विनय नारकर यांची सीमंतिनी चाफळकर यांनी सखोल आणि रसपूर्ण मुलाखत घेतली.
लेखक विनय नारकर आणि मुलखातकार सीमंतिनी चाफळकर यांचे स्वागत आणि सत्कार प्रिसिजन फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत सुरेल पद्धतीने झाली. अपर्णा गव्हाणे आणि रसिका तुळजापूरकर यांनी ‘वस्त्रगाथा’मधील निवडक उतारे, पारंपरिक ओव्या आणि शांता शेळके यांच्या काही कवितांचे अत्यंत प्रभावीपणे अभिवाचन केले. त्यांच्या आवाजात साकारलेली महाराष्ट्राच्या वस्त्र परंपरेची समृद्धता उपस्थित रसिकांवर खोल प्रभाव टाकून गेली.
मुलाखतीत विनय नारकर यांनी त्यांच्या संशोधन आणि सृजनशीलतेच्या प्रवासाविषयी उलगडा केला. या प्रवासाची सुरुवात सोलापूरच्या काही विणकरांना भेटून झाली. त्यांनी त्यांच्या कडून काही कलात्मक साड्या बनवून घेतल्या. ही कलात्मकता त्यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवली. याच सृजनशीलतेतून ‘वस्त्रगाथा’ हे पुस्तक जन्माला आलं.
महाराष्ट्राचे हे वस्त्रवैभव जसे जसे त्यांना समजू लागले, तसं तसे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या वस्त्रपरंपरा उलगडत गेले. या पुस्तकात नारकर यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक वस्त्रपरंपरा, विविध भागांतील साड्यांचे प्रकार, त्यामागील सांस्कृतिक संदर्भ आणि ‘चंद्रकळा’सारख्या खास साड्यांच्या वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास अतिशय आकर्षक शैलीत मांडला आहे. ही फक्त वैशिष्ट्यपूर्ण साड्यांची कहाणी नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची स्त्री आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या वस्त्र प्रकारामधून विणलेली गाथा आहे.
कार्यक्रमाला साहित्य, कलेविषयी आस्था असलेले अनेक रसिक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संवाद, अभिवाचन आणि सादरीकरण यांच्या त्रिवेणी संगमातून हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
प्रिसिजन वाचन अभियान अशा उपक्रमांद्वारे वाचक आणि सर्जक यांच्यातील नातं अधिक दृढ करत असून, साहित्याच्या माध्यमातून सांस्कृतिक समृद्धीची उजळणी घडवत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रिसिजन चे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी केलं.
प्रिसिजन वाचन अभियान या मुख्य कार्यक्रमापूर्वी ५. २५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील हिरवळीवरच वाचन अभियानापूर्वी वाचक कट्टा उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यामध्ये ठराविक वाचकांनी एकत्र येऊन पुस्तक, वाचन व अनौपचारिक गप्पांमधून आपले अनुभव एकमेकांना सांगितले.
वाचक कट्टा संपल्यानंतर वाचन अभियानास सुरूवात झाली.