शासकीय यंत्रणेनं योग्य नियंत्रण ठेवल्यास आपोआप हॉस्पिटल्सना चांगलं काम करावे लागेल. यासाठी मोबाईल अॅपची निर्मिती करत आहोत. यामुळे पेशंट किंवा नातेवाईकांकडून ऑनलाईन आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला येईल. हॉस्पिटलची तक्रार देखील ऑनलाइन पद्धतीने नातेवाईकाला देता येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरमध्ये दिली. गेल्या पाच वर्षात 1 हजार 7 तक्रारी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात आल्या होत्या, असे ते म्हणाले. हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता मोबाईल ॲपद्वारे लोकांना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये बदल
प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल आम्ही केले आहेत. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. पुढील एक महिन्यांमध्ये या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार असल्याचे ते म्हणाले. या योजनेत एकही रुपया पेशंटकडून घ्यायचा नसताना दुर्दैवाने काही हॉस्पिटल पेशंटकडून पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे. त्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. अशा तक्रारींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूरमध्ये चार हॉस्पिटलवर अशी कारवाई झाली असून राज्यात देखील ही कारवाई सुरू होईल.