सोलापूर – प्रिसिजन फाऊंडेशनतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी आयोजित होत आलेल्या प्रिसिजन वाचन अभियान या कार्यक्रमांतर्गत, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात ‘वस्त्रगाथा’ या पुस्तकाचे लेखक विनय नारकर यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
“वस्त्रगाथा” ही केवळ एक माहितीपर कादंबरी नाही, तर ती भारतीय पारंपरिक वस्त्रकलेचा सांस्कृतिक दस्तऐवज आहे. वस्त्रनिर्मिती ही केवळ कला नव्हे तर ती एक जीवनपद्धती आहे, हे लेखकाने दाखवले आहे. विणकरांचे श्रम, त्यांचे कौशल्य, आणि त्यांच्या कामातील तपशील पुस्तकातून समोर येतो.
सोलापुरातील एका हरहुन्नरी कलाकाराने व्यासंगी अभ्यासातून वस्त्र संस्कृतीचा वेध घेणारं पुस्तक लिहिलंय “वस्त्रगाथा”!! या लेखक कलावंताचं नाव आहे.. विनय नारकर. अवघ्या सहा महिन्यात या पुस्तकाने मराठी वाचकांवर गारूड केलंय. पुणे, नाशिक, संभाजीनगर अशा शहरात या पुस्तकाचे प्रकाशन सोहळे गाजले… अल्पावधीतच काही पुरस्कारही या पुस्तकाच्या ओंजळीत पडले…
अशा या हरहुन्नरी, कलासक्त व्यक्तिमत्वाला अर्थातच लेखक विनय नारकर यांची मुलाखत सीमंतिनी चाफळकर या घेणार आहेत. तसेच “वस्त्रगाथा” या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन अपर्णा गव्हाणे, रसिका तुळजापूरकर आणि श्रुताली नारकर हे करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सायं – ६:२५ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असून,
प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी सोलापुरातील तमाम साहित्य प्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन केलं आहे.