सोलापूर, दि.15 : सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे आणि हात धुणे या त्रिसूत्रीची प्रत्येकाने अंमलबजावणी करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी केले.
मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, दक्षिणचे तहसीलदार अमोल कुंभार, जिल्हा परिषद सदस्य रेखा राजेंद्र गायकवाड, पंचायत समितीचे सदस्य विजय राठोड, गटविकास अधिकारी राहुल देसाई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिगंबर गायकवाड, सरपंच ब्रम्हनाथ पाटील, माजी सभापती नळपती बनसोडे, ग्रामसेवक नागसेन कांबळे, पोलीस पाटील सागर बिराजदार, बाजार समितीचे संचालक राजू गायकवाड, विस्तार अधिकारी सचिन चव्हाण, मंडल अधिकारी जगदेव धनुरे, तलाठी भिमाशंकर भुरले आदी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, कोरोनाने प्रत्येक व्यक्तीला कसे जगावे हे शिकवले आहे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यायला हवी. कोरोनातून बरे झाल्यानंतर लोक निर्धास्त राहतात. तसे न करता काळजी घ्यावी. शासनाने आता ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंर्गत आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन प्रत्येक कुटूंबाच्या आरोग्याबाबतची माहिती घेईल. आरोग्य तपासणी करणार आहे.
डॉ. ढेले म्हणाले, कोरोनापासून लोकांचा बचाव करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे कोरोनावरील उपचार करणे सोपे होणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येकाने गर्दीत जाणे टाळावे. मास्क वापरावे. वेळोवळी हात धुवावेत.
श्रीमती पाटील म्हणाल्या, कोरोना विषाणूला हद्दपार करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्याला आपल्या घरातून गावातून बाहेर काढण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत प्रत्येकांनी सहभागी व्हावे.