येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शहरातील अनधिकृत बांधकाम आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटाव या दोन्ही कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षभरात दिलेले पाच हजार बांधकाम परवाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याचे काम सुरू झाले आहे. शिवाय सोलापूर विजापूर हा शहरातून जाणारा रोड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून तो मुक्त करण्याचा धाडसी निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. याबाबत जाहीर प्रसिद्धीकरण देखील करण्यात आले होते. उद्यापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. जुना विजापूर नाका ते ए जी पाटील कॉलेज पर्यंत दुतर्फो असणाऱ्या सर्विस रोडवरील अतिक्रमणे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून काढणार असल्याचे जाहीर आवाहन महापालिका आयुक्तांनी केली आहे. प्रारूप विकास आराखडा तसेच पूर्व पश्चिम बाजू कडील बारा मीटर रुंद सर्विस रोडवरील सर्व अतिक्रमणे नागरिकांनी आजच काढून घ्यावीत अन्यथा उद्यापासून ती महापालिकेकडून काढली जातील आणि त्याचा दंड संबंधित मिळकतदाराकडून वसूल केला जाईल असे देखील आयुक्तांनी जाहीर केले आहे. अशीच धाडसी मोहीम सर्व मोठ्या रस्त्यावर सुरू केली तर शहर अतिक्रमण मुक्त व्हायला वेळ लागणार नाही हे नक्की.