सोलापूर विद्यापीठात अध्यापक विकास कार्यशाळेस प्रारंभ
सोलापूर, दि. 22- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) व मशीन लर्निंगच्या युगात शिक्षकांनी अध्यापन व संशोधनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा व वांग्मय संकुलातर्फे पीएम उषा निधी अंतर्गत पाच दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू प्रा. डॉ. महानवर हे बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रमुख अतिथी मुंबई येथील वाणिज्य व्यवस्थापनाचे प्रा. डॉ. रिंकेश छेडा, भाषा व वांग्मय संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. तानाबाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक प्रा. विजयकुमार झुंबरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

कुलगुरु प्रा. महानवर म्हणाले की, शिक्षक हा कायम विद्यार्थी असतो. आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवनवीन कौशल्य शिक्षकांनी आत्मसात करावीत. आता एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक आवश्यक भाग बनला आहे. त्याचाही वापर शिक्षकांनी अध्यापनात करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्र-कुलगुरु प्रा. दामा यांनी विद्यापीठास पीएम उषा योजनेअंतर्गत शंभर कोटी निधी प्राप्त झाल्याने विविध उपक्रम चालू आहेत तसेच विद्यापीठाची प्रगती सुरू असल्याचे सांगितले.
डॉ. छेडा यांनी शिक्षकांच्या या विशेष कार्यशाळेमुळे निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले. अशा या कार्यशाळेमुळे शिक्षकांना नवनवीन अध्यापन कौशल्य प्राप्त होतात. तसेच त्यांचा मानसिक विकासही चांगला राहतो, असे सांगितले. डॉ. गौतम कांबळे यांनी पीएम उषा योजनेअंतर्गत अध्यापक विकास कार्यशाळा आयोजनामाची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. तानाबाई पाटील यांनी मानले.