सोलापूर, दि.12- रोजगार निर्मितीसाठी उद्योग क्षेत्र खूप खूप मोठे माध्यम आहे. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या माध्यमातून समाजाचा व देशाचा चौफेर विकास होतो. उत्पादन व निर्यात वाढवून आत्मनिर्भर भारतासाठी देशातील युवकांनी योगदान द्यावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील उद्योगवाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केली.
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आयक्यूएसी विभागामार्फत “सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, उद्यमशीलता आणि विद्यापीठांची भूमिका” या विषयावरील आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय चर्चासत्रात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती, महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे
होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाकडून उद्योगवाढीसंदर्भात करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. औद्योगिक रचना बदलत आहे, याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी. पूर्वी घरोघरी व्यापार, उद्योगाचे माध्यम होते. आता ती परिस्थिती नाही. उद्योग वाढले पाहिजे, स्थलांतर थांबले पाहिजे. यासाठीच उद्योगविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले. आयक्यूएसी विभागाचे संचालक डॉ. व्ही. बी. पाटील यांनी स्वागत केले. प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची यात प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून होत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. दूरदृष्टी ठेवून प्रत्यक्ष कृती करणारे देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. ग्रामीण व शेती आधारित उद्योगांवर लक्ष केंद्रित करून त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बलस्थानांचा अभ्यास करून प्रक्रिया आधारित उद्योगवाढीसाठी सोलापूर विद्यापीठाकडून प्रयत्न व्हावेत. डाळिंब, ऊस, बोर यासारख्या पिकांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग निर्मिती शक्य आहे. हॅण्डलूम व पावरलूमच्या विकासासाठीही विद्यापीठाने पुढाकार घ्यावा. यासाठी सोलापूर विद्यापीठात हॅण्डलूम व पावरलूम सबसेंटर सुरू करण्याकरिता प्रस्ताव दिल्यास त्यास मंजुरी दिली जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती देण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावे आणि विद्यापीठाकडून त्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहनही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उपक्रमाचे कौतुक केले. देशाच्या विकासात उद्योग क्षेत्राचे मोठे योगदान आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी देखील देशात उद्योग क्षेत्र विकसित केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
चौकट:-
उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती
सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर उद्योग वाढले आहे. साखरेपासून आणि प्रक्रिया उद्योग करण्याची संधी आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास शेतकरी, कारखानदारांना त्याचबरोबर नागरिकांनाही मोठा फायदा होणार आहे. इथेनॉल वरील वाहनांची निर्मिती होत आहे पेट्रोलचा भाव 85 रुपये असताना आजचा भाव प्रति लिटर 25 रुपये असतो त्यामुळे सहाजिकच वाहनधारकांना ही परवडणारा आहे. उसाच्या रसापासून साखरेपेक्षा इथेनॉल निर्मिती केल्यास कारखानदारांनाही फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही हमीभाव देण्यास परवडणारे होते. म्हणून इथेनॉल निर्मितीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणे अपेक्षित असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केले.