छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज माहिती दिली. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आज मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली. त्यावेळीच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनबाबत फडणवीसांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरू होणार आहे. ज्यामध्ये सुंदर अशा प्रकारची आयकॉनिक रेल्वे सुरू होईल. यामार्फत दहा दिवसांची टूर केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, जागा, त्यांच्याशी संबंधित इतर सांस्कृतिक स्थळांना ही रेल्वे जोडणार आहे.”