सोलापूर दिनांक – जानेवारी २०२५ रोजी पालिका प्रशासनाने संपूर्ण सोलापूर शहराला एकदिवसा आड पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. वास्तविक पाहता आजमितीस शहरात ५ दिवसा आड, ७ दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. तसेच शहरातील विविध भागात गढूळ, दुषित, मैला मिश्रित अस्वच्छ पाणी पुरवठा होत आहे. याची सखोल चौकशी व तपासणी करण्यात यावी. यासाठी लागणारे साधन सामग्री, मनुष्यबळ, तंत्रज्ञ याची पूर्तता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यात यावी. सदर काम युद्धपातळीवर चालू करावे. तसेच मोदीखाना येथील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे झालेल्या दोन निष्पाप शाळकरी मुलींच्या दुर्दैवी निधनास कारणीभूत असणाऱ्या संबधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावे. दुषित पाणी पिल्याने बाधित असलेल्या रुग्णांचे उपचार मोफत करावे, त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक तोशिष लागू देऊ नये व मयताच्या कुटुंबियास २५ लाख रुपये आर्थिक मदत करावे अशी मागणी मा.आयुक्त यांच्याकडे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी केली.

मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मोदीखाना बाबू जगजीवनराम झोपडपट्टी येथे झालेल्या शाळकरी मुलींच्या दुर्दैवी मृत्य प्रकरणी मयताच्या कुटुंबियास आर्थिक मदत मिळाले पाहिजे ही मागणी घेऊन निवेदन देण्यात आले.या प्रसंगी शिष्टमंडळात ॲड अनिल वासम,अमित मंचले,शंकर म्हेत्रे, मारेप्पा फंदीलोलू, शिमोन पोगुल,अजय भंडारी अशोक म्हेत्रे व मयताचे कुटुंबीय आदींची उपस्थिती होती.
यावेळी मा.आयुक्त डॉ.सचिन अंबासे म्हणाले की, मयताच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यासंबंधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे शिफारस करणार आहे. तसेच सोलापूर शहरात सुरळीत व दोन दिवस आड किंवा तीन दिवस आड पाणी पुरवठा होण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील.त्याचे नियोजन सुरू आहे.