दिनांक 07 एप्रिल 2025, सोलापूर, येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व संविधान निर्मितीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर संविधान सप्ताहाचे आयोजन दिनांक ०७ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. त्यानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन प्रशालेत करण्यात आले आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी व समाजात संविधानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, मूलभूत हक्क व कर्तव्य माहिती व्हावेत, भारतीय निवडणूक पद्धती,राष्ट्रपती, पंतप्रधानांची निवड पद्धती, त्यांचे अधिकार व कार्यपद्धती, कायदे निर्मितीची प्रक्रिया इत्यादी संदर्भात विद्यार्थ्यांना व समाजातील नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने शासनाने हर घर संविधान अभियान राबवले आहे. त्याअंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रशालेत सामान्य ज्ञान व रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक समावेत सामूहिक भारतीय संविधान वाचन करण्यात आले.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ.वाल्मीक कीर्तीकर, संस्थेच्या वरिष्ठ दीप्ती शहा मॅडम, प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित मॅडम, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रशालेच्यावतीने प्रमुख अतिथी डॉ. वाल्मीक कीर्तीकर यांचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक मोहोळे सर यांनी केला. आपल्या प्रस्ताविकपर भाषणातून मोहोळे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच हर घर संविधानांतर्गत वर्षभर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
या अंतर्गत आज पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांची संविधानावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा व रंगभरण स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत 1100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनंत बळळे सर, अनुप कस्तुरे सुकुमार वारे,प्रवीण कंदले. सुहास छंचुरे माधवी खोत , प्रिती वऱ्हाडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.