पुणे : आपल्या देशात नागरिकांच्या हक्कांबद्दल बहुतांश लोक सजग नाहीत. त्यामुळेच त्यांना देण्यात येणाऱ्या सरकारी आणि खासगी सुविधांची वानवा असल्याचं दिसतंय. पण एखाद्या सजग नागरिकाने मनात आणलं तर या व्यवस्थेला तो धडा शिकवू शकतो. असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.पेट्रोल पंपावर प्यायला पाणी नाही, स्वच्छतागृह स्वच्छ नाही आणि कर्मचारीही गणवेशात नाहीत अशी तक्रार एका पुणेकराने कंपनीकडे केली. त्यानंतर कंपनीने त्या पेट्रोल पंप चालकाला 60 हजारांचा दंड ठोठावला.
पेट्रोल पंपावर सुविधा न देणे चालकाला चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर प्यायला पाणी नाही, चाकात हवा भरण्याची सोय नाही आणि स्वच्छतागृह स्वच्छ नाही अशी तक्रार एका पुणेकराने कंपनीकडे केली. प्रफुल सारडा या युवकांने कोंढवा मुल्ला नगर परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपाची तक्रार कंपनीकडे केली होती.
या तरुणाच्या तक्रारीनंतर कंपनीने त्याची पडताळणी केली. त्यावेळी कंपनीच्या निदर्शनास या गोष्टी आल्या त्यानंतर कंपनीने संबंधित पंपचालकाला 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामध्ये पाण्याची सोय, स्वच्छतागृह आणि कर्मचाऱ्यांचा गणवेश या गोष्टींवर दंड आकारण्यात आला.