सोलापूर,दि.8: सोलापूर जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्टअखेर उद्दिष्टाच्या 80 टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी आज दिली.
जिल्ह्यात यंदा खरिपाखालील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे पीक कर्जाच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार पीक कर्ज वाटप केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याची अग्रणी बँक असणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू आणि श्री. नाशिककर यांनी पीक कर्ज वाटपाबाबत विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार 31 ऑगस्टअखेर ११५१.७६ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम उद्दिष्टाच्या 80 टक्के आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 1438.52 कोटी रुपयांचे खरीप हंगामासाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील खाजगी बँकानी त्यांच्या उद्दिष्टाच्या 163 टक्के तर विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने सुमारे 146 टक्के कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आतापर्यंत 60 टक्के कर्ज वाटप केले आहे. त्यांचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी नियोजन केले आहे,असे श्री. नाशिककर यांनी सांगितले.
उर्वरित 20 टक्के पीक कर्जाची रक्कम लवकरच वितरीत केली जाईल. गरजू शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह आपल्या बँकेच्या शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन श्री.नाशिककर यांनी केले आहे.
पीक कर्ज वाटपाची सविस्तर माहिती
बॅंकेचे नाव | खरीप हंगाम उद्दिष्ट (रू. लाखामध्ये) | खरीप हंगाम वाटप (रू. लाखामध्ये) | खरीप हंगाम टक्केवारी |
राष्ट्रीयीकृत बॅंका | १०५९६९.०० | ६३५९९.०१ | ६०.०२ % |
खाजगी बॅंका | १८२८६.०० | २९८५२.७८ | १६३.२५ % |
सोलापूर जि.म.स. बॅंक | १५४५७.०० | १५६४३.७७ | १०१.२१ % |
विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक | ४१४०.०० | ६०८१.२९ | १४६.८९ % |
एकूण | १४३८५२.०० | ११५१७६.८५ | ८०.०७% |