प्रदीप पुरोहित म्हणाले, मी ज्या क्षेत्रातून येतो. तो एक डोंगरी भाग आहे. तिथे गिरीजाबाबा नावाचे एक संत राहातात. त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी योग्य सांगितलं होतं. ते म्हणाले की, आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदींचा पूर्वजन्म जो होता, त्यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराज होते. आता त्यांचा दुसरा जन्म नरेंद्र मोदी म्हणून झालाय. त्यामुळे तेच भारताला सर्वांत शक्तिशाली राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारंवार अपमान करण्याचे आणि महाराष्ट्रातील तसेच जगभरातील शिवप्रेमींची अस्मिता दुखावण्याचे नियोजनबद्ध कारस्थान भाजपच्या नेतेमंडळींकडून केले जात आहे. या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा जिरेटोप नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवरायांचा घोर अपमान केला. आणि आता या भाजप खासदाराचे हे घृणास्पद वक्तव्य ऐका…शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदींनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावे.