संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. सुरेश धसयांनी हे प्रकरण सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर लावून धरले होते. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आकाचे आका म्हणत सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीची बातमी बाहेर येताच सुरेश धस यांच्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. यानंतर सुरेश धस हे आज मस्साजोग गावात दाखल झाले. त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी टीकेचे धनी झालेल्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर तोफ डागली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्यावर मला बोलायचं नाही. मी एवढा जीव लावला होता, समाजाने त्यांना तळ हातावर घेतलं होतं. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची गरज नव्हती. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं की पक्षाने माझ्यावर दबाव आणलेला आहे. मला सांगत आहेत मॅटर दाबून टाक तू मागे सरक, सुरेश धसांनी अशी सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही हे धसांनी म्हणायला पाहिजे होतं. मी धनंजय मुंडे यांना भेटायला जात नाही. मी पक्षाचा आणि आमदारकीचा पण राजीनामा देत आहे, असं धस यांनी म्हणायचं होतं. धस यांच्या विषय माझ्यासाठी संपलेला आहे, अशी टीका त्यांनी केली.