सोलापूर : सेंटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइब (माजी गुन्हेगार जमात) च्या लोकांसाठी असलेल्या राखीव जागेवर अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नियोजित सर्वोदय समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सोलापूरच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले.
शहरातील सेटलमेंटमध्ये ब्रिटिश काळापासून क्रिमिनल ट्राइब नावे भूखंड आहे. हा भूखंड माजी गुन्हेगार समाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैकाडी, पामलोर, टकारी, छपरबंद, बेस्तर, लमाण, रजपूत भामटासह १४ समाजातील बेघर, वंचित नागरिकांना शासनामार्फत घरे बांधून मिळण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. संस्थेच्या मागणीवरून शासनस्तरावर हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच शासन निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, शासनाच्या या जागेवर काही भूखंड माफियाने अतिक्रमण करून जागेची ३ ते ५ प्रति गुंठ्याप्रमाणे बेकायदा विक्री सुरू केली आहे. यात काही शासकीय कर्मचारी अधिकारी यांनीही या ठिकाणी मोठमोठे घरे बांधलेले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी न घेता आरसीसी बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइब नावे असलेल्या जागेची देखरेख सामाजिक न्याय विभागाकडे आहे. संबंधित विभागाने हे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश पारित करावे व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक भारत जाधव यांनी केली आहे. यावेळी गृहनिर्माण संस्थेचे संचालक नागनाथ गायकवाड, दशरथ गायकवाड, अरुणा वर्मा, विनोद जाधव, राम गायकवाड, पवन गायकवाड, अॅड. चंदप्पा श्रेत्री, महंमद इंडिकर, अंकुश जाधव, राजू जाधव, सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते.
समाजकल्याणच्या पत्राचे काय?
सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राइबच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत १८ ऑगस्ट २०२३ रोजी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी महानगरपालिकेला पत्र पाठवले होते. पत्रामध्ये जागेवरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यावर कारवाई झाली नव्हती. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या मनीषा फुले यांच्या अभिपत्याखाली हा भूखंड आला आहे. त्यांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा भारत जाधव यांनी व्यक्त केली आहे.