पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धमकी सत्रामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. करवाढीसारख्या गंभीर विषयावर चर्चा होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र तसे काही घडले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर शुल्क लागू करण्याची मोठी घोषणा केली. ट्रम्प यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली. ते म्हणाले की, हा जशास तसा कर अमेरिकेच्या मित्र आणि शत्रू अशा दोन्ही देशांना लागू असेल. व्यापारात निष्पक्षता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे अमेरिकन उत्पादनांना चांगली स्पर्धा मिळेल.
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम भारतावर होणार आहे. अमेरिकेच्या इतर अनेक व्यापारी भागीदारांपेक्षा भारताला या शुल्काचा अधिक फटका बसेल. ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार संबंधांमध्ये नवीन आव्हाने येऊ शकतात, विशेषत: पंतप्रधान मोदी अमेरिकेला गेले असतानाही ट्रम्प यांनी आपल्या धोरणात कोणताच बदल केला नाही.
जगात कुठेही भारत सर्वाधिक कर आकारणारा देश
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जगात कुठेही भारत सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. ते कर आकारण्याबाबत खूपच कडक आहेत आणि मी त्यांना दोष देत नाही, पण व्यवसाय करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे. भारतात विक्री करणे खूप कठीण आहे कारण त्यांच्याकडे व्यापार अडथळे आहेत, खूप मजबूत शुल्क आकारणी आहे. आपण सध्या एक परस्पर (जशास तसा कर) राष्ट्र आहोत. जर ते (भारत) असेल किंवा कमी शुल्क असलेले दुसरे कोणी असेल, तर आपणही तेच करणार आहोत. भारत जे काही शुल्क आकारेल, आपण ते आकारणार आहोत. दुसरा देश जे काही शुल्क आकारेल, आपण तेच आकारत आहोत. म्हणून त्याला परस्पर म्हणतात.