सोलापूर : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामीण रूग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. या रूग्णालयासाठी एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 26 पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.
वळसंग हे अक्कलकोट-सोलापूर मार्गावरील महत्वाचे आणि मोठे गाव आहे. याठिकाणी ग्रामीण रूग्णालय झाले तर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय होणार असल्याने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. आरोग्य सेवाचे सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या सहीने हा प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे.
वळसंग येथे ग्रामीण रूग्णालयाच्या निर्मितीसाठी शासनाने मान्यता दिली होती, त्यानुसार ग्रामीण रूग्णालयाच्या बांधकामासाठी 450 लाख रकमेच्या अंदाजपत्रक आणि नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधीक्षक-1, वैद्यकीय अधिकारी-3, अधिपरिचारिका-7, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी-1, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी-1, औषध निर्माण अधिकारी-1, सहायक अधीक्षक वर्ग 3-1,कनिष्ठ लिपीक वर्ग3-1, लिपीक नि-टंकलेखक-1, प्रयोगशाळा सहायक-1, कक्षसेवक-4, सफाईगार-2, शिपाई-1 अशी 25 पदे आणि रूग्णवाहिकेसाठी एक कंत्राटी वाहन चालकाचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे. 10 नियमित पदे, 13 काल्पनिक कुशल पदे तर 3 काल्पनिक अकुशल पदांचा समावेश आहे. यासाठी सरासरी 1 कोटी 2 लाख 5 हजार 700 रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.