सोलापूर – गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दमानी नगर येथील ह.भ.प.आप्पाराव सवाळकर उद्यानात राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर यांचे” औषधाविना आरोग्य या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गवळी वस्ती तालीम संघाचे आधारस्तंभ महादेव गवळी आणि उत्सव अध्यक्ष विष्णू जगताप यांनी माहिती दिली.
गवळी वस्ती तालीम संघाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमिताने शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करण्याचे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून गेल्या तीन वर्षापासून व्याख्यानमालाचे आयोजन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा यामागे उद्देश आहे. व्याख्यानासोबतच वर्षभर सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमसुद्धा राबविण्यात येतात. शिवजयंतीच्या निमिताने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे. निसर्गोपचार तज्ञ आणि व्याख्याते स्वागत तोडकर यांचे” औषधाविना आरोग्य ” या विषयावर अनमोल असे मार्गदर्शन लाभणार आहे.
स्वागत तोडकर हे निसर्गोपचार तज्ञ असून मनुष्याच्या शारीरिक सर्व व्याधींवर ते घरगुती उपचार सांगतात. शुगर, बीपी, थायरॉईड, गुडघेदुखी, कंबरदुखी, कानाच्या समस्या, केस गळती, पित्त, काळे डाग, मणक्याचे विकार, हृदय विकार, फ्रोजन शोल्डर, मुळव्याध, डोळ्याचे आजार, कॅन्सर यासह संधिवात आदी आजारांवर औषधे खाण्यापेक्षा घरगुती नैसर्गिक उपाय करूनच आजाराला बाय-बाय करण्याचा सल्ला स्वागत तोडकर देतात. हसत खेळत रहा, आनंदी रहा, आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्याचा मनमुराद आनंद लुटा असा सल्ला देतानाच शहाण्या माणसाने कोर्ट आणि दवाखान्याची पायरी चढू नये असे ते निक्षूण सांगतात. निरोगी जीवन जगण्यासाठीची प्रेरणा देणाऱ्या स्वागत तोडकर यांच्या व्याख्यानासाठी हजारो नागरिकांची गर्दी असते. याच पार्श्वभूमीवर निरोगी आरोग्याचा सल्ला देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने यंदाच्या तिसऱ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित रविवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दमानी नगरातील ह. भ. प. आप्पाराव सवाळकर उद्यानात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी हेमंत पिंगळे, बाळासाहेब घुले, शामराव गांगर्डे, शेखर कवठेकर, अरविंद गवळी, सुनील कदम, बबलू जगताप, संदीप काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.