नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, सत्येंद्र जैन.. आम आदमी पक्षातील ही दिग्गज नावं. निवडणुकीत पराभूत झालीत. तब्बल 26 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाजपाने पुन्हा दिल्लीचं सिंहासन ताब्यात घेतलं. या निवडणुकीत भाजपाची सुप्त लाट होती. या लाटेत आम आदमी पार्टीच्या दिग्गज नेत्यांचेही गड ढासळले. अरविंद केजरीवाल. पक्षाचे सर्वेसर्वा. पण त्यांनाही पराभवाचा फटका बसला. भाजपाचे फायरब्रँड नेते परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. नवी दिल्ली मतदारसंघातील निवडणूक अतिशय चर्चेची ठरली. या विजयानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. यात परवेश वर्मांचं नाव आघाडीवर आहे. केजरीवालांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले प्रवेश वर्मा आहेत तरी कोण हे जाणून घेऊ या..
परवेश वर्मा यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1977 रोजी दिल्लीत झाला. भाजपाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री स्व. साहिब सिंह वर्मा यांचे ते पुत्र आहेत. त्यांच्या आईचं नाव रामप्यारी वर्मा. प्रवेश वर्मा यांचं प्रारंभिक शिक्षण आरके पूरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये झालं. यानंतर त्यांनी किरोडीमल कॉलेजातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर पुढे त्यांनी इंटरनॅशनल बिजनेसमध्ये एमबीए केलं.
राजकारणात एन्ट्री, पराभव पाहिला नाही
परवेश वर्मा यांनी सन 2013 मध्ये राजकारणात पदार्पण केलं. महरौली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी भाजपाच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव केला होता. यानंतर 2014 मधील लोकसभा निवडणुकीत परवेश वर्मा यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून नशीब आजमावलं. याही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत परवेश वर्मा यांनी काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांचा तब्बल 5 लाख 78 हजार 489 मतांनी पराभव केला होता.