मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप
सोलापूर : मराठी भाषेचा प्रवास उल्लेखनीय आहे. या भाषेचा वारसा हरवत नाही. प्रत्येक जण नव्याने शोधत अन् मांडत असतात. संत साहित्याचे मराठी भाषेत मोठे योगदान आहे. मराठी भाषेमध्ये प्रशासकीय लोकांनीही चांगले योगदान दिले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातून जागर झाला आणि या जागरातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. सुंदर, रचनात्मक आयुष्य जगण्यासाठी हा एक प्रयत्न होता, असे प्रतिपादन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले.
सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरिय शाखा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, महापालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने दि. 20 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप इंद्रभुवन इमारतीच्या मागील बाजूस
झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर मसाप जुळे सोलापूर अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्यवाह गिरीश दुनाखे,
मसाप दक्षिण सोलापूर कार्याध्यक्ष प्रशांत बडवे , अ.भा. मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा अध्यक्ष विजय साळुंखे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सहकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, यावेळी पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध सत्रातील प्रमुख वक्ते, नाट्य व नृत्य मधील सहभागी कलाकार , आयोजक संस्था पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांचा प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पंधरवडा यशस्वीतेबद्दल उपायुक्त आशिष लोकरे यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांची समयोजित भाषणे झाली.
उपायुक्त आशिष लोकरे यांनी यावेळी मराठी भाषेचा प्रवास मांडला. मोडी भाषेचेही आता वर्ग सुरू आहेत. मराठी भाषेचा प्रवास उल्लेखनीय असाच आहे. ग्रामीण जीवनातील ओव्या, अभंग आणि भूपाळी यांची सर कशालाही येणार नाही मात्र नव्या पिढीला त्याचा विसर पडत आहे. त्याचा जागर होणे गरजेचे आहे. पंधरवडा निमित्त विविध चांगले कार्यक्रम घेता आले. गीत रामायण भरत नाट्य या कार्यक्रमाने चार चांद लावले. विविध कार्यक्रमातून सकारात्मक ऊर्जा मिळाली. महापालिका लोकांसाठी आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे. मराठी भाषेत प्रशासकीय लोकांचेही योगदान आहे. ते भविष्यातही राहील. आपले आयुष्य मशीन सारखे झाले आहे. आयुष्यात साचलेपणा आल्याने तो झटकण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला, असेही उपायुक्त आशिष लोकरे म्हणाले.
प्रास्ताविक नाट्य परिषदेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांनी केले. तर मसापचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी मिळकतकर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर ,
सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक रजाक पेंढारी, कामगार कल्याण जनसंपर्क अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, प्रा. देविदास गायकवाड, प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे , प्रा. नानासाहेब गव्हाणे, मारुती कटकधोंड , रेणुका बुधाराम यांच्यासह साहित्यिक आणि विभाग प्रमुख, अधिकारी , कर्मचारी नागरिकांनी , साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. कोटणीस स्मारकातील ॲम्पीथिएटर माफक दरात भाड्याने देणार
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकातील छोटे ॲम्पीथिएटर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध उपक्रमासाठी देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हे डॉ. कोटणीस स्मारकातील ॲम्पीथिएटर माफक दराने भाडे स्वरूपात देण्याची तयारी दर्शवली असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.