जे आरोपी खंडणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना हाणमार केली, माझे वडील अडवण्यासाठी गेले होते आणि माझ्या वडिलांवरच उलट हाणमार झाली. त्यांना वाटते की त्यांना हाणमार झाली म्हणून त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. , पण माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत. मग ते वार त्यांना का दिसले नाहीत, असा थेट सवाल मृत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी महंत नामदेवशास्त्री यांना केला.
बीडच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक केली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला. यानंतर आता मृत संतोष देशमुख यांचे कुटुंब भगवान गडावर जाणार आहे. नामदेवशास्त्री यांना सर्व पुरावे देऊन न्याय मागणार असल्याचे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटले होते.
माझ्या वडिलांवर किती वार झालेले आहेत. रक्त सांगाळलेले आहे. माझ्या वडिलांवर किती घाव झाले, ते त्यांना दिसले नाहीत का, एका चापटीनंतर त्यांच्यावर किती घाव झाले, ते त्यांना का दिसले नाहीत, अशी विचारणा वैभवी देखमुख यांनी केली. तसेच न्यायाधीश सुद्धा वकिलांच्या दोन बाजू ऐकतो आणि नंतरच मत मांडतो. परंतु, शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला दुःख वाटते, अशी खंत वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवली. याशिवाय, आम्हाला वाटते की, त्यांनी आमचीही बाजू ऐकावी आणि नंतर विधान करावे. माझे वडील वारकरी होते, त्या नात्याने जरी आमच्या घरी आले नसले तरी आम्ही त्यांना भेटणार आहोत. आमची बाजू आणि घडलेली घटना त्यांना सांगणार आहोत, असा निर्धार वैभवी देशमुख यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, आमच्याजवळ पुरावे आणि कागदपत्रे आहेत, घटनाक्रम आहे, वडिलांची हत्या कशामुळे झाली ते सांगणार आहोत. त्यांना दुसरी बाजू माहिती असेल नसेल, समजली असेल नसेल ते आम्ही सांगतो. एका चापटीमुळे मारेकऱ्यांची मानसिकता बदलली असे त्यांना वाटले. पण माझ्या वडिलांची हत्या झाली त्याचे काही वाटले नाही. महाराष्ट्र एकोप्याने आमच्यासोबत आहे. तसेच सर्वांनी आमच्यासोबत राहावे, अशी अपेक्षा वैभवी देशमुख यांनी व्यक्त केली.