विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
पंढरपूर (ता.02) आज 02 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे संपन्न झाला.
असा पार पडला विवाह सोहळा………।
सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.
दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपुजा सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या शुभहस्ते पार पडली.
त्यानंतर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला.
यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला. असल्याची माहिती मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.