- जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती
सोलापूर : कोरोना झाला तर सामान्य जनतेला कोणत्या हॉस्पिटलमध्ये जावे… बेड उपलब्ध आहे का…महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आहे का…. याची माहिती नसते. मात्र आता दवाखान्याच्या नाव, फोनसह बेड उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने ww.solapur.gov.in/corona या संकेतस्थळावर सामान्य जनतेला माहिती उपलब्ध करून दिली असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने आपल्या आधुनिक उपक्रमाद्वारे सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामीण भागातील सर्व कोविड सेंटरमधील, सामान्य तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांच्या उपलब्धतेची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. ही माहिती नियमित दररोज अपडेट केली जात असून सध्यस्थितीत माहिती बिनचूक ठेवण्याचे आदेश सर्व कोविड सेंटर्सना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या डीसीएच, डीसीएचसीमधील अद्ययावत बेडची माहिती सामान्य जनतेसह जिल्हा प्रशासनाला पाहता येते. या संकेतस्थळाचे संपूर्ण नियंत्रण अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत हे करीत आहेत.